गणपती विसर्जन पूजा : गणपती विसर्जन पूजा कशी करावी ?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- यंदा कोरोनाच्या सावटामुळे कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्याकडे अनेकांचा कल असेल. मिरवणूका, ढोल ताशे नसल्याने बाप्पाला यंदा अगदी साध्या पद्धतीने निरोप देण्यात येईल.

मात्र बाप्पा जाताना तुमची सारी दुःख, निराशा, त्रास घेऊन जावो आणि तुमच्यावर शुभआशीर्वादांचा वर्षाव करो! याच अनंत चतुर्दशी निमित्त शुभेच्छा!

अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात.महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात.

या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात

साहित्य: पूजेच्या विविध वस्तू आपल्या हातालगत ठेवाव्यात. हात धुण्यासाठी किंवा मूर्ती पुसण्यासाठी दोन वेगवेगळे कपडे जवळ ठेवावेत. पूजेसाठी शुद्ध पाणी एका ताब्यांत भरून ठेवावे.

पूजा प्रारंभ
पूजेसाठी दिलेली प्रत्येक क्रिया वाचून तिचे अनुसरण करा. प्रत्येक क्रियेची माहिती व सूचना दिलेली आहे.
दीपक पूजन: दिव्यात तूप घालून कापसाची वात लावा. दिवा लावल्यानंतर हात धुवा. नंतर दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा.
(नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा.)
मंत्र: ‘हे दीप देवा! आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा. पूजा चालू असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित रहावे.’
(हातातील पाकळ्या दिव्याजवळ ठेवा)

खालील तीन मंत्रापैकी प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हातावरून पाणी सोडा.
1. ओम केशवाय नम: स्वाहा…. (आचमन करा)
2. ओम माधवाय नम: स्वाहा…. (आचमन करा)
3. ओम गोविंदाय नम: स्वाहा…. (आचमन करा)
4. ओम ऋषीकेशाय नम: स्वाहा….(हातावर पाणी घेऊन ताम्हनात सोडा)

गणेशाचे ध्यान
ध्यान मंत्र: (प्रणाम करून म्हणा) सृष्टीच्या सुरवातीच्या काळात जे प्रकट झाले ते आज जगाचे परमकारण आहे. गणपती चार भुजाधारी आहे, गजवदन असल्यामुळे त्याचे दोन्ही कान सुपासारखे आहेत, त्याला केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्याला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत.

त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसर्‍या हातात अंकुश, तिसर्‍या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रेबरोबर मोदक धारण केलेला आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो कुणी गणपतीची नेहमी पूजा करतो त्या व्यक्तीला योगीत्व प्राप्त होते.’ हे गणराया! तुला प्रणाम करतो.

स्नान, पंचामृत स्नान:
विधी: पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला क्रमश: स्नानिय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.

मंत्र:
स्नान समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): ‘हे देवा! सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ असलेल्या गंगाजलाने तुला स्नान घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर’.
पंचामृत स्नान: (पंचामृतापासून स्नान)
‘हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखरेनेयुक्त पंचामृताने तुला आंघोळ घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर.’
शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान):
‘हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी समाविष्ट आहेत. तू स्नानासाठी हे जलग्रहण कर.’
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा.

वस्त्र किंवा उपवस्त्र:
वस्त्र किंवा उपवस्त्र असे दोन वस्त्र अर्पित करा.
मंत्र:
1. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करणार्‍या ‘हे देवा! हे वस्त्र तुझ्या सेवेत अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे.
2. ‘हे प्रभू! विविध प्रकारची चित्रे, नक्षीकामाने सुशोभित असलेले हे वस्त्र तुला अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे’.
महागणपतीला नमस्कार करून वस्त्र अर्पण करा.

गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा इत्यादीने पूजा करा.
मंत्र:- ‘हे देवा! सुखदायक, सुंदर आणि सौभाग्याप्रमाणे लाल असणारा हा शेंदूर शुभ्र आणि इच्छापूर्ती करणारा आहे. तुझ्या सेवेत तो सादर करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!
(दुर्वा अर्पण करा)
‘हे प्रभु! जाईजुईची सुगंधित फुले किंवा त्यांच्या माळा तुझी पुजा करण्यासाठी आणल्या आहेत. तू त्याचा स्वीकार कर!’
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती तुला नमस्कार करतो.
(वरील मंत्र म्हणून गंध, फुले किंवा फुलमाळा, शेंदूर व विविध सुगंध, अंजीर, दुर्वांकुर, गुलाल इत्यादी अर्पण करा)

सुगंधित धूप
अगरबत्ती लावून देवापुढे ओवाळा.
मंत्र: उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप ‘हे प्रभू! तुझ्या सेवशी समर्पित आहे. तू त्याचा स्वीकार कर.
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करा. (वरील मंत्र बोलून धूप सगळीकडे पसरवा)

दीप दर्शन:
यासाठी एक वेगळा दिवा लावला जातो. दिवा लावल्यानंतर हात धुऊन खालील मंत्र म्हणा.
मंत्र: ‘हे देवा! कापसाच्या वातीपासून प्रज्वलित दिवा तुझ्या सेवेत अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा! हे माझ्या परमात्मा स्वरूप गणपती देवा! मी तुला हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा! तू मला नरक यातनापासून वाचव. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा कर.’

ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा.
(वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपती्च्या दिशेने प्रज्वलित करा) (नंतर हात धुऊन घ्या)

नैवेद्य दाखवा.
गणपतीला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळांमध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावेत.
देवाला नैवद्य अर्पण करण्यापूर्वी दोन्ही हात जोडून प्रार्थना करा की या नैवद्याचे अमृत होऊ दे. ‍त्यानंतर खालील मंत्र म्हणून नैवद्य अर्पण करा.

गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी.
गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात.

पूजा पूर्ण झाल्यावर प्रार्थना करावी व विसर्जनासाठी
“यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।”

असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात , म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेलं देवत्व विसर्जित होतं. त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी.

मग मूर्ती उचलून फिरत्या हौदात, घरच्या घरी बनवलेल्या कुंडात, अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करत घरच्याघरीच विसर्जन करावे. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला’ असा जयघोष करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!