Gas Cylinder Booking :घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे आधीच हैराण असलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. घरगुती गॅसची किंमत व वाहतूक दर याबाबत ग्राहक अनभिज्ञ असल्याने, गॅसची सेवा पुरविणारे काही पुरवठादार व काही एजन्सीधारक ग्राहकांना अक्षरशः लुटण्याचे काम करत आहेत.
त्यांची महिन्याची कमाई हजारोंची असल्याचे स्पष्ट दिसून येते. घरगुती गॅस सिलेंडरचे सध्याचे दर आजमितीस १११७. ५० रुपये असताना संपूर्ण सरासरी ११७० रुपये दराने गॅस सिलेंडरची विक्री केली जात आहे. सर्वसामान्य ग्राहक हे गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे त्रस्त आहेत.
गॅसच्या किंमतीत वाढ झाली की, सरकारच्या नावाने सर्वजण लाखोली वाहतात. गॅसच्या किंमतीवर सरकारचे योग्य नियंत्रण असलेच पाहिजे; मात्र ग्राहकांनादेखील किंमतीबाबत तसेच वाहतूक दर याबाबत माहिती असली पाहिजे. कारण याचा गैरफायदा घेत सध्या गॅस सिलेंडरची सेवा पुरविणारे पुरवठादार एका गॅस सिलेंडरमागे किमान ५० रुपये जास्त घेत असल्याचे दिसून येते.
यामध्ये साधारण ५ किमी अंतरावर घरपोहोच सेवा देण्यासाठी कोणताही वाहतूक दर नाही. ५ किमी अंतरावर मोफत सेवा पुरविली जाते. म्हणजेच येथे मूळ किंमत १११७.५० रुपये इतकीच रक्कम अपेक्षित आहे. तसेच ५ ते १० किमी अंतरावर घरपोहोच सेवा देण्यासाठी मूळ किंमत अधिक २० रुपये वाहतूक दर आकारला जातो.
तर १० ते १५ किमी अंतर असलेल्या ठिकाणी सेवा देण्यासाठी २५ रुपये अधिक वाहतूक दर आकारला जातो. तर १५ ते २० किमी अंतर असलेल्या ठिकाणी ३० रुपये अधिक वाहतूक दर आकारला जातो. तसेच २० ते २५ किमी अंतर असलेल्या ठिकाणी ३५ रुपये वाहतूक दर आकारला जातो.