Jio Financial Loan Service | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या मुकेश अंबानी यांच्या कंपनीने आर्थिक जगतात एक मोठं पाऊल उचललं आहे. आता तुम्ही तुमच्या शेअर्स किंवा म्युच्युअल फंड तारण ठेवून घरबसल्या अवघ्या 10 मिनिटांत 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकता. कंपनीने ही सुविधा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी जिओ फायनान्स अॅपचा वापर करून ही प्रक्रिया पार पाडावी, असं आवाहन कंपनीकडून करण्यात आलं आहे.
जिओ फायनान्शियलने जाहीर केल्याप्रमाणे, ग्राहक त्यांच्या डीमॅट खात्यातील शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स गहाण ठेवून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. डीमॅट खाते म्हणजे आपल्या गुंतवणुकीचं डिजिटल रूपात असणारं बँकसमान खाते असतं. ग्राहकांनी आपला डेटा अपलोड केला की काही मिनिटांतच त्यांच्या खात्यावर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे बँकेमध्ये रांग, वेळखाऊ प्रक्रिया आणि कागदपत्रांची झंझट या सगळ्यांपासून सूट मिळणार आहे.

व्याजदर किती?
या कर्जावर 9.99 टक्क्यांपासून व्याजदर लागू होतो. मात्र, ग्राहकाची जोखीम प्रोफाइल पाहून हा दर कमी-जास्त होऊ शकतो. कमी जोखमीच्या ग्राहकांना कमी व्याज लागेल, तर उच्च जोखीम असलेल्या ग्राहकांना थोडं अधिक व्याज भरावं लागू शकतं. महत्वाचं म्हणजे या कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकांना 3 वर्षांचा कालावधी मिळेल. आणखी एक दिलासा म्हणजे जर कोणी मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केली, तर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही.
जिओ फायनान्सकडून ही सेवा मंगळवारी अधिकृतपणे सुरु करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल असून, ग्राहकांना कुठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कर्ज घेण्याची ही सोपी व सुरक्षित पद्धत अनेक गरजूंना मोठा दिलासा देणारी ठरू शकते.
शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्ससारखी गुंतवणूक
ही सुविधा विशेषतः अशा ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकते ज्यांना अचानक मोठ्या आर्थिक गरजा भासतात आणि त्यांच्याकडे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्ससारखी गुंतवणूक आहे. त्यांचे तात्पुरते गहाण ठेवून ते त्वरित निधी उभा करू शकतात आणि गरजा पूर्ण करून पुढे या मालमत्तेची मुक्तता करू शकतात.
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली जिओ फायनान्शियलने NBFC क्षेत्रात केलेली ही एन्ट्री भविष्यात मोठा बदल घडवू शकते. या नव्या योजनेमुळे जिओ फायनान्स आता आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक पाय रोवताना दिसत आहे.