अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 : – कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे पत्रकार व शिक्षकांना फ्रन्टलाइन वर्कर्सचा दर्जा द्यावा.
त्यांना विमा संरक्षण, लसीकरण व अन्य वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून गणल्या जाणार्या सर्व प्रसार व प्रसिध्दी माध्यमच्या पत्रकारांना कोरोना महामारीत फ्रन्टलाइन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण, विमा संरक्षण व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
मागील वर्षभरात कर्तव्य बजावत असताना अनेक कर्तव्यदक्ष पत्रकारांना कोरोनाची बाधा होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे लोकशाही समाजाचे मोठे नुकसान होत आहे. अशाच रीतीने मागील वर्षापासून कोरोनाच्या कामासाठी शिक्षकांना विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहेत.
ही कामे करताना अनेक शिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. दोनशेपेक्षा अधिक शिक्षक बांधवांचे मृत्यू झालेले असून, त्यांच्या कुटुंबीयांना विमा मिळाला नाही.
शहरी व ग्रामीण भागात डॉक्टरांसह शिक्षक कोरोना काळात सेवा देत असून, त्यांना आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शिक्षकांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नसून शिक्षक जीव मुठित धरुन कार्य करीत आहेत.
तरी सदर प्रश्नी गांभीर्याने लक्ष देऊन पत्रकार व शिक्षकांना फ्रन्टलाइन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांना विमा संरक्षण, लसीकरण व अन्य वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम