अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- 1 एप्रिल 2019 पासून राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णयावर त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांना लाभ होणार आहे.
शरद पवार यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने दि. 12 नोव्हेबर 2020 रोजीच्या शासन निर्णयाने साखर कामगारांच्या वेतन वाढीवर निर्णय घेणेसाठी त्रिपक्षीय समीती स्थापन केलेली आहे.
या समितीच्या आजपर्यंत दि.16 डिसेंबर 2020, दि.12 जानेवारी 2021, दि.11 फेब्रुवारी 2021 व दि. 26 फेब्रुवारी 2021 अशा बैठका झाल्या. परंतु या बैठकांमध्ये साखर कारखाना प्रतिनिधी 5 ते 8 टक्के वेतनवाढ, तर साखर कामगार संघटना 20 टक्के वेतनवाढ मिळण्यासाठी ठाम होत्या.
तोडगा न निघाल्याने माजी कृषीमंत्री शरद पवार यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांनी साखर कारखानदार व साखर कामगार प्रतिनिधीशी चर्चा करून 12 टक्केपर्यत वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार गुरुवार दि.9 सप्टेंबर रोजी त्रिपक्षीय समितीची बैठक संपन्न झाली. त्यात 12 टक्के वेतनवाढ देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 1 एप्रिल 2019 पासून ही वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे.
दरम्यान राज्यातील साखर कामगारांच्या वेतन कराराची मुदत 31 मार्च 2019 रोजी संपली होती. त्रिपक्षीय समिती तातडीने गठीत करून नवीन वेतनवाढ मिळावी यासाठी राज्यातील साखर कामगार संघटनांनी राज्य शासन व शरद पवार यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम