Google Pixel 10a : गुगल कंपनीने त्यांच्या पिक्सेल a-सिरीजमधील नवीन 5G स्मार्टफोन Google Pixel 10a लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारपेठेत 18 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला जाणार आहे.
मार्च 2025 मध्ये लाँच झालेल्या Pixel 9a चा हा उत्तराधिकारी (successor) असणार असून, परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम अनुभव देण्याचा गुगलचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
गुगलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून Pixel 10a च्या लाँच तारखेची माहिती दिली आहे. मात्र, फोनची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, गुगल स्टोअरवर 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजून 29 मिनिटांपर्यंत साइन-अप करणाऱ्या ग्राहकांना खास ऑफर मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही ऑफर Pixel 10a खरेदीदरम्यान किंवा भविष्यातील ऑर्डरवर वापरता येणार आहे.
डिझाइनमध्ये फारसा बदल नाही
डिझाइनच्या बाबतीत Google Pixel 10a हा Pixel 9a सारखाच असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये फ्लॅट ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, सिंगल LED फ्लॅश आणि मागील बाजूस मध्यभागी असलेले गुगलचे लोगो ब्रँडिंग पाहायला मिळू शकते.
समोरच्या बाजूस जाड बेझल्स आणि सेंटर-अलाइन होल-पंच डिस्प्ले कटआउट असण्याची अपेक्षा आहे. गुगलने शेअर केलेल्या टीझर इमेजमध्ये हा फोन निळ्या रंगात दिसत असून, तो Pixel 9a च्या ‘आयरिस’ रंगाशी मिळता-जुळता आहे.
स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
Google Pixel 10a च्या स्पेसिफिकेशन्सबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, कंपनीने हा फोन आतापर्यंतचा सर्वात टिकाऊ Pixel A-सिरीज स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे.
यामध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षण (improved dust and water resistance) देण्यात येणार आहे. Pixel 9a प्रमाणेच, Pixel 10a मध्येही Gemini बिल्ट-इन AI असिस्टंट देण्यात येण्याची शक्यता आहे.
अपेक्षित किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, गुगल Pixel 10a हा स्मार्टफोन भारतात 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करू शकते.
त्यामुळे हा गुगलच्या नवीनतम सिरीजमधील सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. आता 18 फेब्रुवारीला होणाऱ्या लाँचकडे सर्व टेकप्रेमींचे लक्ष लागले आहे.













