पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी शिवारात अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमधून सुमारे आठ लाख दहा हजार रुपये किमतीचा हिरा कंपनीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोकॉ. राजेंद्र रामदास बडे यांनी फिर्याद दिली असून, ट्रकचा चालक दत्तू नामदेव खेडकर, रा. चुंभळी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ढवळेवाडी शिवारात एका मालवाहू ट्रकला अपघात झाला असून, यामध्ये सुगंधी सुपारी व तंबाखू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले असता, अशोक लेलँड कंपनीचा (एमएच १७, एजी ९२२४) हा ट्रक रस्त्याच्या कडेला चरांमध्ये गेला होता.
पोलिसांना ट्रकमध्ये सुगंधी तंबाखूच्या गोण्या आढळून आल्या. यामध्ये चार लाख वीस हजार रुपये किमतीच्या हिरा कंपनीच्या दहा गोण्या सुगंधी सुपारी, ९० हजार रुपये किमतीची हिरा कंपनीची सुगंधी तंबाखू व तीन लाख रुपये किमतीचा मालवाहू ट्रक, असा आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी गुटखाबंदी कायद्यानुसार भादवी ३२८,१८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मालवाहू ट्रकमधील गुटखा कुठून आला व कुठे जाणार होता, याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.