Maharashtra Politics : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना फुटीनंतर कोण कशाप्रकारे शुभेच्छा देते, याकडे लक्ष लागले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही ठाकरे यांना कशा शुभेच्छा देतात याकडे लक्ष लागून होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला आहे.

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….” अशा शुभेच्छा शिंदे यांनी दिल्या आहेत. बंडखोरीनंतर शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत परस्पर नवी जाहीर केली.
त्याचप्रमाणे धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह शिवसेनेवर दावा सांगण्याचा प्रयत्नही शिंदेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी ठाकरेंचा ‘शिवसेना पक्षप्रमुख’ हा उल्लेख टाळणे लक्षवेधक ठरत आहे.