Ahmednagar News : अतिवृष्टीची भरपाई मंजूर झाली;पण अजूनही शेतकरी भरपाईपासून वंचित

Published on -

Ahmednagar News : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची भरपाई मंजूर झाली; परंतु काही शेतकऱ्यांच्या पदरात अजून ती पडली नाही. अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहिला असल्याने त्यांना रोज बँकेत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांकडून थेट राहाता येथे जाण्याचा सल्ला मिळाल्याने याविषयी राहाता तालुक्यातील चितळी परिसरात शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.

अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणतांबा मंडळातील अतिवृष्टीतून वगळलेली गावे खास बाब म्हणून समाविष्ट करून घेतली होती.

त्यात उशीरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली आणि मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई शेतकरी वर्गांच्या बँक खाती जमा झाली; मात्र बहुतांशी शेतकऱ्यांच्या पदरात ही रक्कम अजून पडली नसल्याने, त्यांची घोर निराशा होऊन रक्कम जमा झाली की नाही, हे पाहण्यासाठी रोज बँकांची पायरी चढण्याची वेळ आली आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या केवायसीमध्ये त्रुटी होत्या, त्या दुरुस्त करूनही अनुदानाची वाट पहावी लागत आहे. संबधीत विभागाने यात लक्ष घालून उर्वरित शेतकऱ्यांचा बँक खाती अनुदान लवकरात लवकर जमा करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील शेतकरी करत आहे.

स्थानिक तलाठी शिंदे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी ‘त्या याद्या वरूनच येतात. आमच्या हातात काही नाही. तहसील कार्यालयातील क्लार्कना कामाचा लोड असल्याने राहाता येथे खासगी ठिकाणी जावे’, असा उपरोधक सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नुकसान भरपाई मिळवण्याच्या प्रयत्नांत अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत. त्यांना रोज बँकेच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत. त्यांना रोज बँकेत जाऊन चौकशी करणे शक्य होत नाही. अडचणी रोजच तयार होत आहे. त्यात राहाता येथे जाऊन परत हेलपाटे मारण्याची वेळ येते की काय, यात त्यांची हेळसांड मोठ्या प्रमाणात होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe