अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव मध्ये झालेल्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी गावाला तडाखा दिला. या पावसाच्या पाण्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच खरीप पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून कांबीमधील काहींची जनावरे व कोंबड्या वाहून गेल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.
मात्र यंदा शेवगाव – पाथर्डी तालुक्यात पावसाचा जोर काहीसा जास्त असल्याचे दिसून आले. नुकतेच शनिवार पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.
रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत राहिला. त्यामुळे बोधेगावच्या काशी नदीला पूर आला. कांबी येथे झालेल्या पावसामुळे येथील स्थानिक नदीला पूर आल्याने गावातील हनुमान मंदिर,
ग्रामपंचायतीचे व्यापारी गाळे, तापकीर हाॅटेल, खराद कृषी सेवा केंद्र, विश्वाससानंद कृषी सेवा केंद्र, सिमेंट दुकान, चप्पल दुकान, अमोल फोटो स्टुडिओमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
सुमित पांचारिया यांची पाळीव जनावरे वाहून गेली तर बाळासाहेब होळकर यांच्या कांदा चाळीत पाणी गेल्याने नुकसान झाले आहे.
तसेच शेवगाव-गेवराई मार्गावरील काळ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा मार्ग रात्री अकरापासून बंद झाला. मोठी मालवाहू वाहनेच या छोट्या पुलावरून मार्गक्रमण करू शकत असून लहान वाहने, दुचाकी, पादचारी यांना मात्र येथून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम