गृहिणींचे बजेट कोलमडणार… खाद्यतेलाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-   गृहिणींची चिंता वाढवणारी तसेच बजेट अस्थिर करणारी माहिती समोर येत आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलांच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

रशिया- युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती, इंडोनेशिया, मलेशियातील तेल निर्यातीवरील निर्बंध तसेच दक्षिण अमेरिकेतील हवामान बदलामुळे तेथून आयात होणाऱ्या पाम तेल, सूर्यफूल, सोयाबीन या तेलांची आवक घटण्याची शक्यता आह़े त्यामुळे खाद्यतेलांच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

दरवाढीस आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत… भारतात दरवर्षी २५० लाख टन खाद्यतेलांचा वापर केला जातो. त्यापैकी १६० लाख टन खाद्यतेल परदेशातून आयात केले जाते.

युक्रेनमधून सूर्यफुलाच्या तेलाची आयात केली जाते. रशिया- युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून होणारी सूर्यफूल तेलाची आयात कमी होणार आहे. इंडोनेशिया, मलेशियात पाम तेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील सरकारने पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.

ब्राझील, अर्जेटिना या देशांतील हवामानामुळे सोयाबीनच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम खाद्यतेलांच्या आयातीवर होणार असून फेब्रुवारीनंतर पुन्हा खाद्यतेलांचे दर टप्याटप्याने वाढण्याची शक्यता खाद्यतेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

भारतात पाम तेलाचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. मलेशिया, इंडोनेशियातून निर्यात होणाऱ्या पाम तेलातील पाम स्टेरीनचा वापर वनस्पती तुपात केला जातो. या दोन्ही देशात सध्या करोना संसर्गामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याने पाम तेलाचे उत्पादन घटले आहे.

त्यामुळे तेथील सरकारने निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. पाम तेलाची ६० जहाजे तेथील बंदरात आहेत. त्यापैकी १५ जहाजे भारताची आहेत.

निर्बंधामुळे ही जहाजे परदेशात रवाना होऊ शकत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर स्थिरावले आहेत. शेंगदाणा तेल, मोहरी तेलाचे उत्पादन देशात मोठय़ा प्रमाणावर केले जाते.

मात्र, खाद्यतेलांची एकंदर गरज पाहता परदेशातून होणाऱ्या तेल आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे फेब्रुवारीनंतर खाद्यतेलाच्या दरात पुन्हा टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe