अहमदनगर –महाराष्ट्र विधानसभाचे (Maharashtra Legislative Assembly) माजी उपाध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांनी एक सूचक वक्तव्य केल्याने जिल्हयात अनेक चर्चांना उधाण आले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मला कोणतीच निवडणूक लढवायची नाही असं वक्तव्य केल्याने चर्चांना जोर आलं आहे.
पाडळीतर्फे कान्हूर (ता. पारनेर) येथे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत मंजूर झालेल्या 85 लाख 50 हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण औटी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की एकच माणूस सतत निवडून येत नाही, हेच लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. समाजजीवनात काम करताना, ज्या समाजात आपण राहतो, त्याचे काही देणे आहे, या भावनेतून आपण काम केले पाहिजे. समाजासाठी काम करण्याचा भाग म्हणजे निवडणूक असते. त्यामध्ये हार-जित होतच असते. निवडणूक जिंकली पाहिजे हा अट्टहास काहीच कामाचा नाही.
पुढे ते म्हणाले (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक लढविली नाही. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना आपल्या कामात सातत्य असले पाहिजे. समाजाला प्रबोधन करणे, मार्गदर्शन करणे, समाज चुकीच्या दिशेने चालला असेल तर संबंधितांना समजावून सांगणे, हेच पुढारपण करणाऱ्यांचे काम आहे. मला कोणतीच निवडणूक लढवायची नाही. मात्र, तालुक्याची घडी बिघडवू नका.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, बाबासाहेब तांबे, उपतालुकाप्रमुख तुषार बांगर, भाळवणीचे उपसरपंच संदीप ठुबे, गंगाधर रोहोकले, काळकूपचे उपसरपंच विलास सालके, प्रकाश कोरडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती काशिनाथ दाते होते.