मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अनेक बंडखोर आमदारांनी तोफ डागली आहे.शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी देखील आता संजय राऊत यांना डिवचलं आहे.
संजय राऊत यांच्या रोज सकाळच्या भजन-कीर्तनाचा जनतेलाच कंटाळा आला होता. संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती, असा हल्लाबोल महेश शिंदे यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आमदारांचे हे प्रकरण प्रेमाने हाताळले असते तर जे घडले तसे घडलेच नसते, असेही महेश शिंदे म्हणाले आहेत.
शिंदे आणि आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची वेळ आली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे भाजपला हाताला धरुन मुख्यमंत्री झाले. या सर्व घडमोडीनंतर संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत बंडखोरांचा समाचार घेतला होता. राऊतांच्या टीकेला संतापलेल्या महेश शिंदेंनी तिखट शब्दात उत्तर दिले आहे.