Ahmednagar News:मागच्या दाराने येऊन कोणी दबावतंत्राचे राजकारण करत आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल; तर आम्ही अशाच्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही.
अशी टीका कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केली आहे. कर्जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या नुकत्याच सुरू झालेल्या कामाची रोहित पवार यांनी पाहणी केली,

यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की,वर्क ऑर्डर देऊन ३ महिने झाले तरी विरोधकांच्या दबावामुळे मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेचे काम बंद होते. पाण्याअभावी कर्जत-जामखेड मतदारसंघातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असे.
आपण आमदार होण्यापूर्वी प्रत्येक गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा शब्द निवडणुकीत दिला होता. आणि त्यानुसार आमदार झाल्यानंतर तो शब्द आपण पाळला.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत मतदारसंघातील सर्व गावांचा समावेश देखील करून घेतला. परंतु नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आणि कार्यारंभ आदेशही तीन महिन्यांपूर्वी निघाले पण अजूनही येथील जनता तहानलेलीच आहे. कारण राजकीय फायद्यासाठी अधिकारी व कंत्राटदारांवर दबाव आणला जात आहे.