नागपूर : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा पुन्हा एकदा नागपूर (Nagpur) दौरा होणार आहे. विदर्भामध्ये शिवसेनेनला मजबूत करण्यासाठी संजय राऊत यांचा हा तिसरा दौरा आहे. यावरून भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे लवकरच विदर्भ दौरा करणार आहेत. शिवसेनेने थेट विदर्भालाच लक्ष केल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. येत्या काळात विदर्भातून काय राजकीय घडामोडी घडणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले, नागपूरच्या मातीत, वातावरणात एक वेगळंपण आहे. ते नागपूरला आले तर त्यांना सुबुद्धी येईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
यावेळी त्यांनी पोलखोल यात्रेवर झालेल्या हल्ल्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही. पोलिसांनी संरक्षण दिलं तर पोलिसांचीही पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरही फडणवीसांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या का? त्याचं कारण समोर आलं पाहिजे असेही ते म्हणाले.
अमरावती राज्यात इंग्रजांचं राज्य चालायचं, तसं पोलिसांचं राज्य चाललं आहे. विशेषत: लांगूलचालन हे सरकारचे मंत्री करत आहेत. त्यामुळे परिस्थिती वाईट होत आहे. लांगूलचालनामुळे दोन समाज एकमेकांच्याविरोधात उभे राहत आहेत.
हिंदुंना टार्गेट करण्याचं काम अमरावतीत होतंय. पोलिसांनी जात, धर्म न पाहता कारवाई केली पाहिजे असेही मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.