Onion Plantation : नाशिकसह जिल्हाभरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचा थेट परिणाम लाल कांदा लागवडीवर झाला आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली होती.
यंदा ही लागवड ३० हजार हेक्टर क्षेत्रावर होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात असली, तरी आतापर्यंत ६३० हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली आहे. दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने लागवड झालेली कांद्याची रोपेही पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, कांदा लागवडीचे क्षेत्र घटल्यास त्याचा परिणाम लाल कांद्याचे गणित बिघडण्यावर होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून, अनेक भागात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नसल्याने नद्यांना पहिला पूरसुद्धा आलेला नाही. अशातच सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली असून, त्यातच पाऊस गायब असल्याने अनेक पिके कोमेजू लागली आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे कांद्याच्या लागवडीत व्यस्त असतात. ही लागवड ऑगस्टमध्ये करण्यासाठी त्यांची रोपे ही जूनच्या पहिल्या आठवड्यातच टाकावी लागतात. विहिरीच्या शिल्लक पाण्यावर बळीराजाने महागडे उळे (बी) पेरून कांद्याची रोपे तयार केली.
दरम्यान, पाऊस नसल्याने अनेक भागात शेती टँकरवर तग धरून आहे. पाणी कमी पडल्याने टँकरद्वारे ही पाणी दिले जात असून, त्यावर फवारणी करत दोन महिन्यापासून ते रोपे जपली आहेत.
आता कांदा लागवड करण्याची योग्य वेळ आल्याने कांदा लागवडीसाठी शेत तयार करण्यात आली. मात्र, पावसाअभावी कांद्याची लागवड करणे अशक्य झाले आहे.
कांद्याची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे लाल कांदा हेच मुख्य नगदी पीक असून, या लाल कांद्यावरच इथले सगळे अर्थकारण अवलंबून असते.
मात्र, या ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचणी येऊन येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यातच अगोदरच पेरणी केलेली मका, बाजरी, मूग, भुईमूग यांसारखी पिके देखील पाण्याअभावी सुकायला लागली आहेत.