अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- देशात आता काहीशी थंडी कमी होऊन नुकतेच तापमानात वाढ होत असल्याची नोंद होत आहे. यातच वातावरणातील बदलाबाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.
ती म्हणजे पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे देशात सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुढील 24 तासात म्हणजेच उद्यापासून देशात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशासह विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
07 मार्च रोजी हवामान खात्याने नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेघगर्जना होणार आहेत.
तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय पुण्यासह ठाणे, पालघर, अहमदनगर आणि जालना या पाच जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
येथे हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. 08 आणि 09 मार्च रोजी राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. या दिवशी जवळपास सर्वच राज्यात पावसाची स्थिती राहणार आहे.
मंगळवारी (8 मार्च) राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांशी सर्वच ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.