Ahmednagar News : मला दारू प्यायला पैसे देत नाहीत. लहान भावाला मात्र पैसे देता, याचा राग आल्याने वडिलांसमोरच बाबाजी विष्णू फुंदे (वय ३५) याने लहान भाऊ निलेश विष्णू फुंदे हा झोपेत असताना त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालू खून केला.
सख्खा भाऊ पक्का वैरी, अशी म्हण पुन्हा सार्थ ठरली. पोलिसांनी बाबाजी फुंदे याला अटक केली आहे. अतिशय क्रूरपणे खून झाल्याने फुंदेटाकळी येथील खिळावस्ती हादरली आहे.
बाबाजी विष्णू फुंदे याला दारूचे व्यसन आहे. लहान भाऊ निलेश व वडील विष्णू फुंदे हे त्याला वेळोवेळी समजावून सांगत होते. तू दारू पिऊ नको, अशी समज देत होते. त्याचा राग बाबाजीच्या डोक्यात होता. सोमवारी सकाळी सहा वाजता बाबाजीने वडील विष्णू व आई चंद्रकला यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.
आम्ही तुला पैसे देणार नाहीत, असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर तुम्ही मला पैसे देत नाहीत व निलेशला पैसे देता, असे म्हणत मी निलेशला संपवितो, अशी दमबाजी बाबाजीने वडिलांना केली. त्यानंतर लगेच घरात झोपलेल्या निलेशच्या डोक्यात कऱ्हाडीने घाव घातले, निलेश झोपेतच बेशुद्ध झाला.
वडील विष्णू फुंदे यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावले. मात्र, डोक्यात जबर मार लागल्याने रक्तत्राव झाला. निलेशला तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून निलेशला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारापूर्वीच निलेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
निलेश फुंदेवर कुऱ्हाडीचे वार करून बाबाजी घरातून पळून गेला. तो पाथर्डीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शेवगाव रस्त्याने शहरातून बाबाजी पळत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, निलेश म्हस्के, किरण बड़े यांनी बाबाजीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
विष्णू काशीनाथ फुंदे रा. खिळावस्ती, फुंदेटाकळी यांनीपोलिसांत फिर्याद दिली आहे. बाबाजी विष्णु फुंदे याच्या विरुद्ध खुनाचा गन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बाबाजीला अटक केली आहे. पोलिसनिरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
रात्री उशिरा निलेश फुंदे यांच्यावर फुंदेटाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एका मुलाचा जीव गेला आणि दुसरा मुलगा तुरुंगात गेल्याने विष फुंदे यांची अवस्था फारच दयनीय झाली आहे. डोळ्यासमोर मुलाचा खून झाला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे.