भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. खेडकर यांनी महागड्या मोटारीवर लाल दिव्याचा वापर केला आहे.
तसेच त्यांच्या मोटारीवर वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा थकीत दंडही आहे. मोटार वाहन अधिनियमान्वये (मोटार व्हेईकल अॅक्ट १७७) नुसार खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
खेडकर प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना त्यांनी खासगी मोटारीवर लाल दिव्याचा वापर केल्याचे उघडकीस आले. प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या चेंबरचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्याने तक्रार देखील केली. त्यानंतर या प्रकरणात डॉ. दिवसे यांनी राज्य शासनाकडे अहवाल पाठवून तक्रार दिली.
खेडकर यांनी मोटारीवर लाल दिव्याचा वापर केल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार बाणेर येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी चतुःशृंगी पोलिसांचे पथक पोहोचले होते.
पोलिसांचे पथक बंगल्यावर पोहोचले, तेव्हा बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी खेडकर कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खेडकर प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. असे असताना त्यांनी खासगी मोटारीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावली होती. तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता. मोटार वाहन अधिनियमान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खेडकर यांच्या बंगल्यात जाऊन पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा बंगल्यात कोणी नसल्याने कारवाई पूर्ण झाली नाही. पूजा खेडकर यांच्या महागड्या मोटारीवर वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा थकीत दंड आहे.
खेडकर यांनी मोटारीवर लाल दिव्याचा वापर केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार मोटार वाहन अधिनियमान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे मनोज पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.