आगामी काळात जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही : आ. रोहित पवार

Published on -

अहिल्यानगर : जामखेड येथील तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा घणाघाती आरोप आमदार रोहित यांनी केला आहे.

जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या बदलीचा मंगळवारी आदेश निघाला असून त्यांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे बदली करण्यात आली आहे. अवघ्या एका वर्षात या अधिकाऱ्याची बदली झाल्याने जामखेडच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यात आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली असून सोयीच्या गटरचनेला नकार दिल्यामुळे शिक्षा म्हणून तहसीलदारांची बदली गडचिरोलीला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियात केलेल्या ट्विटमध्ये सत्तेचा कसा गैरवापर केला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जामखेडच्या तहसीलदारांची झालेली बदली असा उल्लेख केला आहे. ‘जिल्हा परिषद निवडणुकीची गटरचना करताना ती राजकीयदृष्ट्या आपल्या सोयीची व्हावी यासाठी काही गावांचा विशिष्ट गटात समावेश करण्याचा हट्ट तहसीलदारांनी मान्य केला नाही. त्यामुळं अहंकाराला धक्का लागलेल्या नेत्याने पदाचा गैरवापर करत राजकीय दबावाला बळी न पडता नियमाप्रमाणे काम करणाऱ्या तहसीलदारांना थेट गडचिरोलीचा रस्ता दाखवला.

हाती सत्ता असल्याने काही नेत्यांना अहंकाराची बाधा झाली आहे. मग नियमात नसलेल्या कामासाठीही अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असून नियमबाह्य आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याची दुर्गम भागात बदली केली जाते. वास्तविक प्रामाणिक अधिकारी असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळत असेल तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची कशी अपेक्षा करता येईल? त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!