Ahmednagar News : आधीच विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा नवीन समस्या निर्माण झाली आहे.
ती म्हणजे जनावरांना होत असलेल्या लंपी या आजाराची. सुरूवातीला अकोले आणि श्रीरामपूर तालुक्यात मर्यादित असणाऱ्या जनावरांतील लंपी स्किन या आजाराचा आता जिल्ह्यातील १० तालुक्यात प्रसार झाला आहे.
यामुळे पशूसंवर्धन विभागाची धावपळ वाढली असून, या आजाराने पिडीत जनावरे असलेल्या गावातील पाच किलोमीटर पर्यंतच्या जनावरांचे लसीकरण सुरू असण्यात आले आहे.
आतापर्यंत लंपी आजाराची जिल्ह्यात ७६ जनावरांना लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे १० तालुक्यातील ६१ हजार १३९ जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान घाटशिरस येथील एका शेतकऱ्याची गाय व म्हैस लंपी सदृश्य आजाराने आजारी असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाली.
नंतर त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आलेले असून, त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. या प्रकारामुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, गावातील इतर जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावामध्ये डास व गोमाश्या प्रतिबंधात्मक फवारणी करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाने दिले आहेत.
गावात लंपी सदृश्य आजाराची संशयीत जनावर आढळले असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली असून, गावातील इतर शेतकऱ्यांच्या जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने कीटकनाशक फवारणी करण्याची गरज आहे.