देशी विकणाऱ्यांना वाईन बद्दल बोलण्याचा अधिकार नाही !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- अगोदर तुमच्या मालकीचे दारू आणि बिअर निर्मितीचे कारखाने बंद करून मगच तोंड उघडावे. लोणी येथील आपल्या मालकीच्या प्रवरा कारखान्यात रॉकेट नावाची देशी दारू तयार करता

त्याची चव चाखून खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत असाल तर त्याविषयी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नगर उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांना दिले आहे.

खासदार राऊत यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून हजारे यांच्यावर टीका केली होती. खासदार डॉ. विखे यांनी वाईन घेऊन अग्रलेख लिहीत असावेत, अशी टीका केली होती.

या टीकेला प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. त्यात जाधव यांनी म्हटले आहे की, प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आणि वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत, चर्चेत यावे या उद्देशाने खासदार विखे हे बेताल वक्तव्य करीत आहेत.

मध्यंतरी खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य करून तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली तरी देखील तूम्हाला उपरती झाली नाही. हे दुर्दैवी आहे.

जाधव म्हणाले, स्वतःच्या स्वार्थापोटी दलबदलू राजकारण करणे ही आपल्या घराण्याची खासियत आहे. शिवसेना आणि अन्य व्यक्तींवर विखे पिता पुत्र टीका करत आहेत.

तुमच्या कारखान्यात तयार होणारी रॉकेट ही देशी दारू आपण चंद्रपूर येथे दारूबंदी असताना विकत होता. तिथली दारूबंदी उठवण्यासाठी आपण किती आकांड तांडव केला होता.

महाराष्ट्रात मागील काळात दुष्काळ असताना तुम्ही औरंगाबाद येथील बिअर कंपन्यांना पाणी मिळावे व कंपन्या सुरु रहाव्यात यासाठी मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी किती खटाटोप केला हे सर्वाना माहिती आहे, अशी टीकाही जाधव यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe