क्षणात झाले होत्याचे नव्हते… भीषण अपघातात आईसह मुलाचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा येथील म्हसणे फाटा टोलनाक्याजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात सतीष निवृत्ती तरटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. २६ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान म्हसणे फाटा चौकात पुण्याकडून नगरच्या दिशेने दुचाकी (क्र. एमएच १६, एजी ६६६५) चालली होती.

पाठीमागून मालवाहतूक टेम्पो (क्र. एमएच १४, एझेड ६८८४) हा भरधाव वेगाने येत होता. म्हसणे फाटा चौकात दुचाकी चालक रांजणगाव मशीदकडे वळत असताना टेम्पोची दुचाकीला धडक बसली.

या अपघातात दुचाकीवरील बळवंत सुखदेव जवक व पारुबाई सुखदेव जवक (रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) हे मायलेक रस्त्यावर पडून जागीच ठार झाले.

टेम्पोमधील नंदकिशोर गजानन हिवाळे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सुपा पोलिसांनी सतीष तरटे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक विजय विश्वनाय जायभाय याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७ मोटार वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

जखमीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेने रांजणगाव मशीद गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe