अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील मगरे, नितीन मोने, छगन गवई, सिद्धार्थ उबाळे, अरूण चांदणे हे काम पाहत आहेत.
संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांच्या हत्याकांडात अॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले होते. यानंतर या गुन्ह्याचा तपास शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
त्यांनी आरोपी प्रशांत, दिलीप आणि अशोक जाधव यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले, त्यावेळेस आरोपींच्या घरातून जप्त केलेल्या हत्यारांवर रक्ताचे डाग असल्याचा दावा त्यांनी केला होता.
न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत रक्ताचे डाग नसल्याचा अहवाल आला आहे. पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला.
जवखेडे खालसा हत्याकांड 20 ऑक्टोंबर 2014 रोजी घडले. पाथर्डीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुभाष अनमलवार यांच्याकडे 21 ते 23 ऑक्टोंबर 2014 या कालावधीत तपास होता.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्याकडे तपास आला होता. या गुन्ह्यात अर्जुन वाघ यांचा सीआरपीसी 164 चा जबाब नोंदविला आहे. पाथर्डी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हा जबाब नोंदविण्याचे हेतूपुरस्पर टाळले.
त्याऐवजी विशेष दंडाधिकारी भास्कर भोस यांच्यासमोर हा जबाब नोंदविला. सीआरपीसी 164 जबाब नोंदविताना जबाब नोंदविणारा आणि दंडाधिकारी हे हजर पाहिजे असतात.
परंतु, वाघ यांचा जबाब नोंदविताना पोलीस अधिकारी जवळच उपस्थित होते. ही बाब अर्जुन वाघ यांच्या उलट तपासणीत आलेली आहे. त्यामुळे हा जबाब ग्राह्य धरून नये, असाही युक्तीवाद यावेळी करण्यात आला.