Maharashtra news : राज्य महिला आयोगाचे कामात सध्या राजकारण शिरल्याचा गंभीर आरोप करीत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ‘राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद फक्त एकच महिना माझ्या ताब्यात द्या,कायदा काय असतो दाखवून देईन,’ असे आव्हानच राज्य सरकारला दिले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केला आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगाचे नाव बदलून “राष्ट्रवादी महिला आयोग” करा, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

महिला आयोग हे महिलांसाठी प्रत्यक्ष काम करून दाखविण्याचे माध्यम आहे. मात्र सध्याच्या अध्यक्ष त्याचा गैरवापर करीत आहेत. केवळ कार्यक्रम करणे, सोशल मीडियात फोटो अपलोड करणे एवढेच काम नाही.
किंवा पक्षीय दृष्टीकोनातून कारवाई करत अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविणे हे काम नाही. सध्या मात्र, अशा पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसते. जर जमत नसेल तर एक महिना हे पद माझ्याकडे द्या. कसे काम करायचे ते दाखवून देते, असेही देसाई यांनी म्हटले आहे.