सहकारी संस्थांचे वाटोळे करण्याचे काम कर्डिलेंनी केले, शिवसेनेच्या नेत्याचा थेट आरोप

Published on -

Ahmednagar News : नगर तालुक्‍यातील सर्व सहकारी संस्थांचे वाटोळे करण्याचे काम माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी केले असून त्यांची नगर बाजार समितीत असलेली दहशत या निवडणुकीत महाविकास आघाडी मोडीत काढणार असून

मोठ्या मताधिक्क्याने बाजार समितीत सत्ता मिळविणार असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी व्यक्‍त केले. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकारांशी शुक्रवारी (दि.७) सकाळी संवाद साधण्यात आला. त्यावेळी गाडे बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे नेते संपतराव म्हस्के, जि.प.चे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, बाबासाहेब गुंजाळ, उद्धवराव दुसुंगे, भाऊसाहेब काळे, संदीप कर्डिले, अजय लामखडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, राष्ट्रवादी युवकचे गौरव नरवडे आदी उपस्थित होते. प्रा.गाडे पुढे म्हणाले,

या निवडणुकीत कर्डीले गटाचे पानीपत करण्यासाठी महाविकास आघाडीने जिल्हा परिषद सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्‍ती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंकुश शेळके, अजय लामखडे, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कर्डिले २५ वर्षे आमदार होते. या काळात त्यांनी तालुक्‍यात विकास कामे करण्याऐवजी स्व.दादा पाटील शेळके यांनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले आहे. महाविकास आघाडीला माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार यांच्यासह महाआघाडीच्या सर्वच नेते मंडळींचे पाठबळ मिळत असल्याचे म्हटले.

दूध संघाच्या जागेचे काय झाले?

दूध संघाची सावेडीत महामार्गालगत ४ एकर जागा होती. या जागेचे काय झाले? ती कोणाला व कितीला विकली? त्यातून आलेले पैसे गेले कुठे? याची उत्तरे कर्डिले यांनी जाहीरपणे द्यावीत, असे आव्हानही प्रा.गाडे यांनी यावेळी दिले. कांदा ग्रेडींग शेडच्या जागेवर गाळे बांधून ते ३० ते ३५ लाखांना विकले मात्र पावत्या अवघ्या ५ लाखांच्या केल्या. यातून संस्थेचा काडीमात्र फायदा न होता त्यांनी त्यांचे घर भरले असल्याचा आरोपही यावेळी प्रा.गाडे यांनी केला.

प्रताप शेळके म्हणाले, मागील निवडणुकीत महाआघाडीचा निसटता पराभव झाला होता मात्र यावेळी महा आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुक मैदानात उतरली असल्याचे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News