अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- सध्या राज्यात वाईन विक्रीवरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच आरोप प्रत्यारोप, तसेच टीका होऊ लागली आहे. यातच आता या वादात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उडी मारली आहे.
नुकतेच त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सोमय्या म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक आहे.
संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी एका वाइन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीत भागीदार असल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला.
संजय राऊत यांच्या परिवाराने १६ एप्रिल २०२१ मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यानंतर १२ जानेवारी २०२२ रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती कंपनी मंत्रालयाला दिली.
या कंपनीचे नाव पूर्वी मादक होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून मॅक पी, असे ठेवण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी म्हटले की, अशोक गर्ग हे २०१० पासून दोन कंपन्या चालवतात.
यापैकी एक कंपनी वाइन वितरणाचा व्यवसाय करते. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली.राऊत यांनी आपल्या हितसंबंधांची माहिती जाहीर करायला हवी होती, असे सोमय्या यांनी म्हटले.
येत्या काही दिवसांमध्ये मी लवकरच संजय राऊत यांच्या आणखी एका व्यवसायाचे तपशील जाहीर करेन, असेही सोमय्या यांनी म्हटले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम