Ahmednagar News : कोतवाली पोलिसांनी रोडरोमिओंना चांगलाच दणका दिला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहर परिसरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या १८ रोडरोमिओंवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे.
बाडीयापार्क येथे फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, तसेच कोचिंग कक््लासेससाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंकडून त्रास दिला जात होता. काही रोडरोमिओ हे जोरात मोटारसायकल चालविणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, रस्त्यावर वाहने लावून वाढदिवसाचे केक कापणे, मुलींच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या तसेच पाणी फेकणे अशा तक्रारी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे आल्या होत्या.
या तक्रारीची दखल घेत कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी वाडीवापार्क येथील संपूर्ण परिसर, टिळक रोड, बाडीयापार्क मैदानाच्या बाहेरील दुकानाच्या रांगा गस्त घालत वेगात गाडी चालवणारी व गोंधळ घालत असणारी मुले ताब्यात घेतली.
त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे खटले दाखल करण्यात आले. तसेच परिसरातील विनाकारण फिरणाऱ्यांना कोतवाली पोलिसांकडून समज देण्यात आली. या कारवाईचा धसका अनेक रोडरोमिओंनी घेतला असून, आता अशा टवाळखोरांवर वारंवार कारवाई करण्यात येणार असल्याने महिला मुलींनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस कर्मचारी गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, श्रीकांत खताडे, अतुल काजळे, अशोक कांबळे, सतीश भांड, अशोक सायकर यांच्या पथकाने केली.