Ladki Bahin Scheme | राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिच्यावरून राजकारण तापायला लागलं असतानाच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार दौऱ्यात मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, मात्र यामुळे इतर योजना बंद होतील असं अजिबात नाही.
काय म्हणाले कोकाटे?
नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री कोकाटे गेले असताना त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला की, तात्काळ पंचनामे करून मदत दिली जाईल. नुकसानीची अधिकृत आकडेवारी अद्याप न आल्याचं त्यांनी सांगितलं. पण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना कोकाटे म्हणाले की, “राज्याच्या तिजोरीवर जरी ताण आला असला तरी त्याचा परिणाम इतर योजनांवर होणार नाही. सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालतं आहे. न्याय सर्वांना मिळणार आहे.”
विरोधकांवरही सडकून टीका-
यावेळी कोकाटेंनी विरोधकांवरही सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं, “विरोधकांकडे आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते स्वतःला विरोधी पक्ष नेता नेमूही शकत नाहीत. सरकारने वक्फ सुधारणा विधेयक मंजूर केलं आहे आणि त्यावरून आता विरोधक मुस्लिम आणि ख्रिश्चन जमिनीचा विषय काढून जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.”
कोकाटेंच्या मते, “विरोधकांकडे आता काही काम उरलेलं नाही. त्यामुळे ते धार्मिक वाद निर्माण करून जनतेचं लक्ष भटकवू पाहत आहेत. पण जनता सगळं बघते आहे.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण गरम झालं असून विरोधक यावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.