दिल्लीतील आंदोलनाला पाठींबा देणारे नेते राज्‍यातील वीजेच्या प्रश्नावर गप्प काॽ -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-  दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात ॽ असा सवाल भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेत-यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखविणा-या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा आता उघड झाला असल्‍याची टिका त्‍यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसंसद भवनाचे उद्घाटन आणि जिल्‍हा परिषद पाणी पुरवठा योजने अंतर्गत जलशुध्‍दीकरण प्‍लॅटचे लोकार्पण आ.विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. केव्हीडच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारने कोणतीही मदत केली नाही.जिल्ह्याचे तीनही मंत्री कुठे गायब होते समजले नाही.

परंतू आपण शक्य तेवढी मदत करून मतदार संघातील सामान्य माणसाला दिलासा देवून सामाजिक बांधिलकी जपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकाराने आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन हा देश पुन्‍हा आत्‍मविश्‍वासाने पुढे नेण्‍यासाठी केंद्र सरकारने टाकलेले पाऊल हे महत्‍वपुर्ण असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

आत्मनिर्भर भारत योजनेची माहीती सामान्य माणसाला समजावी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मार्गदर्शक पुस्तिका काढून लोकांपर्यत पोहचविणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नविन कृषी धोरणात शेती क्षेत्रातील बदलांचा अंतर्भाव असून या विधेयकांना केला जाणारा विरोध राजकीय द्वेषापोटी आहे.

पण दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे महाविकास आघाडीचे नेते राज्यात शेतक-यांची विज तोडली जात असताना गप्‍प बसतात. राज्‍यातील आणि दिल्‍लीतील शेतकरी काही वेगळे आहेत का? असा सवाल उपस्थित करुन, महाविकास आघाडी सरकारने राज्‍यातील शेतक-यांच्‍या कोणत्‍याही मागण्‍या पूर्ण केल्‍या नाहीत. शेतकरी आणि दूध उत्पादकांवर सरकारकडून अन्यायच सुरु आहे.

त्यांचे शेतकऱ्यांवरील पुतना मावशीचे प्रेम जनतेने ओळखले आहे. राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीने दलाल बाजूला करून शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचा थेट लिलाव सुरू केला आहे.त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत असल्‍याचे त्‍यांनी आवर्जून सांगितले. शिर्डी मतदारसंघात विकासाची प्रक्रीया निरंतर सुरू आहे.आता पर्यत जोर्वे गावातच १६ कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत.विकास कामाना निधी कमी पडणार नाही.फक्त तुम्ही धाडस दाखवा विघ्नसंतोषी लोकांचा बंदोबस्त कसा करायचा मी पाहातो असा इशारा देतानाच या भागात वाळू माफीयांनी हैदोस घातला आहे.

आता बोटी आणून वाळू उपसा करण्याची तयारी त्‍यांची आहे. सत्‍ता त्यांच्या पायाशी असल्याने जोर्व्यातील अनेक वाळू व्यावसायिक राज्यात राजरोसपणे पार्टनरशिप करुन हा व्यवसाय करीत असल्याकडे लक्ष वेधून आ.विखे म्हणाले की,याच वाळू माफीयांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असून ग्रामपंचायत निवडणूकीत याच वाळूच्या पैशांचा जोर होता.तरीही कनोली गावाने दाखवलेले धाडस हे तालुक्याला दिशा देणारे ठरले आहे.

याप्रसंगी भाजपाच्‍या शेतकरी आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष सतिष कानवडे, शेतकरी संघटनेचे संतोष रोहोम, दिलीप इंगळे यांची भाषणे झाली. प्रास्‍ताविक ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोकूळ दिघे यांनी केले.