परदेशात प्रवास करायचा म्हटलं, की नजरेसमोर सुंदर दृश्यं, वेगळ्या संस्कृती, चविष्ट जेवण आणि नवीन अनुभवांची यादी तयार होते. पण या स्वप्नवत कल्पनांमागे एक वास्तव दडलेलं असतं, सुरक्षिततेचा प्रश्न. नुसती पासपोर्ट आणि तिकीटाची तयारी पुरेशी नसते, तर त्या देशात माणूस किती सुरक्षित आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. नुकताच प्रसिद्ध झालेला नुम्बेओ क्राइम इंडेक्स 2025 हाच मुद्दा अधोरेखित करतो.

नुम्बेओचा हा अहवाल जगभरातील नागरिकांच्या अनुभवांवर आधारित आहे. कुठे रात्री एकटं बाहेर पडणं धोकादायक वाटतं, कुठे चोरट्यांची दहशत, कुठे लैंगिक अत्याचारांचा धोका अशा कितीतरी गोष्टींचा विचार करून हा क्राइम इंडेक्स तयार केला जातो. त्यात सरकारी आकडेवारीपेक्षा लोकांच्या प्रत्यक्ष भावना अधिक महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याचा विश्वासार्हपणाही वाढतो.
हैती टॉपवर
या यादीत यंदा हैतीने पहिलं स्थान पटकावलं आहे. येथील परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोक दिवसा सुद्धा आपल्याला सुरक्षित मानत नाहीत. गँगवॉर, दरोडे, अपहरण आणि खून येथे इतके सामान्य झाले आहेत की, इथं राहणं म्हणजे रोज मृत्यूशी सामना करणं.
इतर देशांची यादी
दुसऱ्या क्रमांकावर पापुआ न्यू गिनीचा उल्लेख आहे, ज्यामध्ये समाजात असलेल्या अस्थैर्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर व्हेनेझुएला, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका हे देश येतात , ज्यांच्याबद्दल ऐकताना अनेकदा आपल्याला आश्चर्य वाटतं, पण स्थानिकांच्या अनुभवांनी हे स्पष्ट केलं आहे की इथे हिंसाचार फार सहज घडतो.
होंडुरास, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सीरिया, जमैका या देशांचाही या यादीत समावेश आहे. येथे मालमत्तेच्या चोरीबरोबरच लैंगिक हिंसाचार आणि हत्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर आहे. विशेषतः महिलांसाठी या देशांमध्ये स्वतःचं रक्षण करणं मोठं आव्हान ठरतं.
या देशांमध्ये राहणाऱ्या अनेकांनी नमूद केलंय की, दिवसा काहीसं सुरक्षेचं भान राखता येतं, पण रात्री बाहेर पडणं म्हणजे संकटाला आमंत्रणच. अगदी सार्वजनिक ठिकाणांवरही आपल्याला धोक्याची जाणीव सतत होते.
भारतातील स्थिती
भारताची स्थिती तुलनेत बरी आहे. तो या यादीत टॉप 10 मध्ये नाही, पण पूर्णपणे सुरक्षितही मानला जात नाही. विशेषतः मोठ्या शहरांतील गर्दीची ठिकाणं, रस्ते, आणि महिलांसाठी काही भाग अजूनही असुरक्षित मानले जातात.
महत्त्वाचं म्हणजे, या रिपोर्टमध्ये सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आकडेवारीपेक्षा वेगळी आणि कधी कधी अधिक खरी परिस्थिती समोर येते. कारण अनेक वेळा गुन्ह्यांची नोंदच होत नाही, किंवा लोक पोलिसांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे या अहवालाला केवळ एक आकडेवारी म्हणून न बघता, तो त्या देशातील सामान्य माणसांच्या जीवनाचा आरसा म्हणून पाहायला हवं.