“चिखलात सत्तेचे कमळ फुलणे, महाराष्ट्रात ते शक्य नाही”

Published on -

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) थोडक्या आणि मोजक्या शब्दात ट्विट (Tweet) करून टीका केली आहे. महाराष्ट्रात चिखलात सत्तेचे कमळ फुलणे शक्य नाही असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

सध्या मुंबई महापालिकेच्या (BMC Election) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप आणि टीकास्त्र सुरु झाले आहे. तसेच राज्यात धर्माचे राजकारण टोकाला जाऊन पोहोचले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे मनसेतील काही नेते आणि पदाधिकारी नाराज असल्याचे वृत्त येत होते. तर काहींनी थेट राजीनामाच दिला आहे.

यानंतर रोहित पवार यांनी सलग ३ ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळे बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरून एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधे यांसाठी हातात हात घालून लढत होतो.

त्यामुळे माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावले, पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत असे म्हणत रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, कुणाला वाटत असेल, ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलेल किंवा काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात (Maharashtra) ते शक्य नाही.

आपली संस्कृतीही तसे होऊ देणार नाही. फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe