पुणे : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी कागदावर काहीतरी मजकूर लिहून दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन सर्वसामान्यांनी देखील सोशल मीडियावर या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे.
मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळजी वाटत आहे. त्यांच्याविरोधात षडयंत्र सुरु आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा असा अपमान कधी झाला नव्हता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना चिट्ठी देणे, पत्रकार परिषद सुरु असताना सांगणे, हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. शिंदे साहेबांच्या विरोधात मोठा कट रचला जात आहे, आपण सगळ्यांनी मिळून त्यांना प्रोटेक्ट करणे गरजेचे आहे, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पुणे महानगरपालिका समाज विकास विभागमार्फत महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा वेळी सुप्रिया सुळे यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे.