Maharashtra Drought:- यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाया गेला. राज्यातील कापूस आणि सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या पिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसल्यामुळे उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती. याच अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली व राज्यातील काही तालुक्यांमध्ये म्हणजे चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एवढेच नाही तर याबाबतचा शासन आदेश देखील सरकारने जाहीर केला आहे.
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून यासंबंधीचा शासन आदेश देखील सरकारने जाहीर केला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर स्थिती असून सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
या तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये पावसाचे तूट तसेच उपलब्ध असलेल्या भूजल पातळीची कमतरता, वनस्पती निर्देशांक तसेच मृदा आद्रता व पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून या घटकांमुळे जे तालुके प्रभावी झालेले आहेत त्या ठिकाणी आपत्तीची शक्यता समोर ठेवून सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.
यामध्ये जालना तसेच छत्रपती संभाजी नगर, पुणे, नासिक, बीड तसेच लातूर व धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला?
1- नंदुरबार जिल्हा- गंभीर स्वरूपाचा दुष्काळ नंदुरबार तालुका
2- धुळे जिल्हा- शिंदखेडा तालुका
3- जळगाव- चाळीसगाव तालुका
4- बुलढाणा- बुलढाणा व लोणार तालुका
5- जालना जिल्हा- भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा
6- छत्रपती संभाजी नगर जिल्हा- छत्रपती संभाजी नगर आणि सोयगाव
7- नाशिक जिल्हा-मालेगाव, सिन्नर आणि येवला
8- पुणे जिल्हा- पुरंदर सासवड आणि बारामती, शिरूर घोडनदी, दौंड आणि इंदापूर
9- बीड जिल्हा- वडवणी, धारूर आणि अंबाजोगाई
10- लातूर जिल्हा- रेनापुर तालुका
11- धाराशिव जिल्हा- वाशी, धाराशिव आणि लोहारा
12- सोलापूर जिल्हा- बार्शी,माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा
13- सातारा- वाई, खंडाळा
14- कोल्हापूर जिल्हा- हातकणंगले तसेच गडहिंग्लज
15- सांगली जिल्हा-शिराळा, कडेगाव तसेच खानापूर विटा आणि मिरज
राज्यातील जे काही तालुके यामध्ये बाकी आहेत त्या तालुक्यामधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्या बाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचे अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.