Sanjay Raut : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने शिवसेना ठाकरे गट चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल, शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांनाही संवाद साधताना राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच महाराष्ट्रातील जनता तुमच्यावर थुंकतेय अशी घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
संजय राऊत म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. कोश्यारींनी दळभद्री विधान केलं. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने महाराजांना माफीवीर म्हटलं.
आता शिंदे गट कुणाला जोडे मारणार? महाराजांचा एवढा अपमान होत असताना तुम्ही सत्तेला चिटकून कसे? राजीनामा का देत नाही?, असा सवाल करतानाच महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आहेत. त्यांनी नॅशनल चॅनलवर शिवाजी महाराजांनी सुद्धा पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितल्याचं विधान केलं.
ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? महाराजांनी कधी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा जाब भाजपला विचारणार की नाही? असा प्रश संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
वारंवार शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संभाजी महाराजांचा अपमान करायचा ही भाजपची भूमिका आहे का? शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली?
हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. ते भाजपचे सहयोगी आहेत. मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.