Maharashtra News : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या चार हजार ८३ घरांसाठी आठ दिवसांत १४ हजार ९७८ अर्ज आले असून त्यापैकी ६ हजार ८४७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. १८ जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात या घरांच्या सोडतीचा सोहळा पार पडणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, शीव येथील चार हजार ८३ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सोमवारी सुरुवात करण्यात आली.
एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली अर्थात आयएचएलएमएस २.० (इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम) या संगणकीय सोडत प्रणालीने म्हाडातर्फे ही सोडत काढण्यात येणार आहे. अॅण्ड्रॉईड मोबाइल फोनवर प्ले स्टोअर आणि अॅपल मोबाईल फोनवर अॅप स्टोअरमध्ये सोडत प्रणालीच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे इच्छुक अर्जदारांकरिता सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
म्हाडाने यापूर्वी पुणे, औरंगाबाद, कोकण मंडळासाठी एकात्मिक संगणकीय सोडत प्रणालीचा वापर केला असून मुंबईच्या सोडतीसाठी सध्या ई नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत विविध मंडळाच्या माध्यमातून ६५ हजार ३८५ अर्जदारांनी ई नोंदणी केली आहे.
दिवस नोंदणी अर्ज अनामत रकमेसह अर्ज
२२ मे ६५५ २०८
२३ मे ४२३६ १७००
२४ मे ६६१४ २७८०
२५ मे ८६१८ ३७४९
२६ मे १० हजार २९२ ४६२२
२७ मे १२ हजार २०२ ५५०३
२८ मे १३ हजार ६५० ६२१४
२९ मे १४ हजार ९७८ ६८४७