Maharashtra News : राज्य फाटकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार – मुख्यमंत्री

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात रेल्वे ‘फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो.

म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहेत. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत.

उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे, ही मोहीम लवकरच राबवण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारलेल्या ४४० कोटी रुपयांच्या नऊ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले.

पुण्याच्या शिवाजीनगरमधील पोलीस मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गडकरी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे,

आमदार सुनील कांबळे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायस्वाल, पुणे महानगरपालिका आयुक्‍त विक्रम कुमार, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,

देशात पायाभूत सुविधांची सर्वांधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ क्षमता आहे, दळणवळण सुविधा आहेत. राज्यातील प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक करत आहेत.

दरवर्षी ११ उड्डाणपूल बांधणार- गडकरी

नितीन गडकरी म्हणाले, सेतू बंधन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ उड्डाणपुलांसाठी १०० टक्के निधी भारत सरकारने मंजूर केला आहे. राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे फाटकांचे रूपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि रेल्वेने मिळून नऊ उड्डाणपूल पूर्ण केले आणि ११ पुलांचे भूमिपूजन होत आहे. दरवर्षी ११ पूल याप्रमाणे १६ हजार कोटींची ही कामे करण्यात येणार आहेत. येत्या काळात फाटकमुक्तीसाठी उड्डाणपूल बांधून जनतेला चांगली सुरक्षा देण्यात येईल. पुण्यात पालखी मार्गाचे काम वेगाने होत आहे. पालखी तळाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी चांगला आराखडा करून ही कामे पूर्ण करण्यात येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe