अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मशिदीवरील भोंग्यांचं काय करायचं यावर निर्णय घेताना महाविकास आघाडीच्या सरकारनं सेफ खेळी खेळायचं ठरविल्याचं दिसून येतं.
कोणताही निर्णय एकतर्फी घेण्यापेक्षा यामध्ये विरोधी पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी सोमवारी (२५ एप्रिल) मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच यासंबंधी संकेत दिले होते. जो निर्णय घ्यायचा तो विरोधी पक्षांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असं ते म्हणाले होते.
त्यानुसार ही बैठक होत आहे. यासाठी विरोधी पक्षांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. हा मुद्दा उपस्थित करून लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला येणार की अन्य कोणाला प्रतिनिधीला पाठविणार? की बैठकीकडं मनसे पाठ फिरविणार? याकडं लक्ष लागलं आहे.
भोंगे हटविणं किंवा त्यासंबंधी नियम करणं हा प्रश्न सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनला आहे. त्यामुळं कोणताही निर्णय घेतला तरी कोंडी होण्याची शक्यता गृहित धरून यामध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतल्याचे यावरून दिसून येते.
अर्थात यासाठी विरोधकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हेही पाहणं औत्सुक्याचं आहे. ठाकरे यांनी यासाठी ३ मे पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळं सरकारकडूनही हालचालींना वेग आला आहे. मुंबई आणि नाशिकमध्ये प्रचलित नियमांनुसार कार्यवाहीही सुरू झाली आहे.