Maharashtra Rain : महाराष्ट्रात (Maharashtra) आणि देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) धुमाकूळ घालत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता येत्या काही तासात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याकडून (Weather Department) देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पूरसदृश परिस्थिती (Flood-like conditions) निर्माण झाली आहे. मात्र, आता मुसळधार पावसापासून दिलासा मिळण्याची आशा आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल. त्याचबरोबर येत्या ५ दिवसांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने शनिवारी पालघरमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, अकोला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याआधी शुक्रवारी महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 20.5 मिमी पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यापासून आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट बंद
अतिवृष्टीमुळे 20 गावे बाधित झाली असून 3873 लोकांना सुरक्षित मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. त्याचवेळी मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.
अशा स्थितीत मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये शनिवारी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.
मुंबईचे हवामान
शनिवारी मुंबईत कमाल तापमान 29 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत 35 वर नोंदवला गेला आहे.
पुण्याचे हवामान
पुण्यात कमाल तापमान 26 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 55 वर नोंदवला गेला आहे.
नागपूरचे हवामान
नागपुरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि मधूनमधून पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 21 आहे, जो ‘चांगल्या’ श्रेणीत येतो.
नाशिक हवामान
नाशिकमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत 31 आहे.
औरंगाबादचे हवामान
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत 41 आहे.