Maharashtra ST News : तिकीट अर्धे झाले, पण बसे कुठे आहेत ? एसटी महामंडळाचा गलथान कारभार

Published on -

Maharashtra ST News : ग्रामीण भागाला नव्या गाड्यांचा लाभ फार क्वचितच होत असतो. बहुदा जुन्या बसेस वापरल्या जातात, ग्रामीण भागात एसटीची ही रडकथा आहे. सर्व बाजूंनी सक्षम असणारी एसटी आजही का अडखळते हे न उलगडणारे कोडे आहे.

‘वाट पाहीन, पण एसटीनेच प्रवास करेन’ अशी जाहिरातबाजी झाली, पण सुस्थितीत नसलेल्या बस, स्थानकांमध्ये उभे राहून अपेक्षित बसची प्रतीक्षा करण्याऐवजी प्रवासी खासगी वाहनांकडे वळत आहेत. कारण स्थानकांवरील सोई सुविधा व प्रसाधनगृहांची अवस्था वर्णनापलिकडील आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आवारात खड्डे, कचरा, धूळ व घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी दिवाबत्तीची सोयही नाही. रात्रीच्या वेळी तेथे अंधाराचे साम्राज्य असते. भरमसाठ भाडे आकारणी होत असल्याने अनेक एसटी कॅन्टिनला टाळे लागले असून, हमरस्त्यावरील हॉटेल मालकांचे पोट भरले जात आहे.

प्रवाशांच्या हाल अपेष्टांचे कोणालाही देणे घेणे नाही. सध्या एसटीने ग्रामीण भागातील फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांचे हाल होत असून, अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत आहे. बस फेऱ्यांच्या अनियमितपणामुळे व प्रवासी निवाऱ्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना भरउन्हात ताटकळत उभे राहावे लागते किंवा एखाद्या झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो.

बसच्या फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकदारांची मनधरणी करावी लागत असून, अवैध वाहतुकीला उधाण आले आहे. त्याचा आर्थिक फटका महामंडळालादेखील बसत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील बसफेऱ्या नियमित कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अनेक चढउतार पाहता, प्रत्येक सामाजिक संघर्षाच्या प्रसंगात ग्रामीण प्रवाशांची सेवा करणारी एसटी आज मात्र ग्रामीणभागाकडे पाठ फिरवत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकीट अर्धे झाले, पण बसे कुठे आहेत ? असा प्रश्न महिला विचारत आहेत.

प्रवाशांची सोय पाहून नुकतेच राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासाचे तिकीट भाडे अर्धे केले आहे. या सवलतीचा महिला मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत ; परंतु एसटीच्या फेऱ्या कमी झाल्याने महिलांसह सर्वच चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. परिणामी कुणाच्याही गाडीला हात करून अथवा चालत मुख्य रस्त्यापर्यंत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe