सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही. यावरऔन भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यावरून भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा देखील काढण्यात आला होता.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून निलेश राणे म्हणाले, नवाब मलिक हे पवारांचे खास आहेत, अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा.
नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो.
ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल परबांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’ असे खळबळजनक वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे.
तसेच निलेश राणे यांनी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे. नवाब यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच काळजी अनिल देखमुखांच्या वेळी कुठे होती? असेही निलेश राणे म्हणाले आहेत.
निलेश राणे यांच्या अशा वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतायेत याकडॆ सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.