अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- मनोहर भोसले याच्या विरोधात नुकतंच बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत, लोकांची आर्थिक फसवणूक, खंडणी तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा याचे अहमदनगर जिल्ह्यातील ‘कर्जत कनेक्शन’ आता समोर आले आहे.
कर्जत तालुक्यातील चिलवडी येथेही मनोहरमामाने स्वतःच्या नावावर 9 एकर 2 गुंठ्यांची जमीन अतिशय कमी किमतीत खरेदी केली असल्याचे उघड झाले. कर्जत तालुक्यातील चिलवडी येथेही मनोहरमामाने स्वतःच्या नावावर 9 एकर 2 गुंठ्यांची जमीन खरेदी केली असल्याचे उघड झाले आहे,
खरेदी केलेल्या 3 हेक्टर 62 आर क्षेत्राची सरकारी खरेदी किंमत 21 लाख 85 हजार रुपये एवढी आहे. ही खरेदी 30 एप्रिल 2019 रोजी करण्यात आलेली आहे. खरेदीची ही सरकारी किंमत जरी कमी असली तरी, प्रत्यक्षात ही रक्कम किती असेल हे तपास केल्यावरच समोर येईल.
पोलिस कोठडीत असलेल्या मनोहरमामा भोसलेची बुवा होण्यापर्यंतची कहाणी मोठी रंजक आहे. करमाळा तालुक्यातील सगळ्यात शेवटचं उंदरगाव. तसं तालुक्यापासून जिल्ह्यापासून दूरवर असलेलं गाव आता चांगलंच चर्चेत आलं आहे. मनोहर भोसले यानं उंदरगाव शिवारात उभारलेल्या आश्रमात दर अमावस्येला जणू बाजार फुलेला असायचा.
3000 देणाऱ्यांना रांगेत उभं राहण्यास सांगितलं जायचं. तर एकवीस हजार रुपये देणाऱ्यांना थेट मनोहर भोसलेसमोर उभं केलं जायचं. याठिकाणी येणाऱ्या भोळ्या भाबड्या भक्तांच्या मनात मनोहर उर्फ मनोहरमामा भोसले जणू सद्गुरु बाळूमामाचा अवतार अशी धारणा होती.
मात्र, आता एक एक करत मनोहर भोसलेचे कारनामे समोर येत आहेत. मनोहर भोसले हा 2013 सालापर्यंत झोपडीत राहत होता. त्यानंतर त्याच्या संपत्तीत होत गेलेली वाढ, ही सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. स्वतःच्या नावावर कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे 9 एकर जमीन, तसेच पत्नीच्या नावावर 27 एकर जमीन,
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे दीड एकर जमीन, एक हजार स्क्वेअर फुटाचा बंगला, मठ, तर बारामती तालुक्यातील सावंतवाडी गोजुबावी येथे एक मठ, महागडे फर्निचर, महागडे मोबाईल, लाईट, पाणी, संरक्षक भिंती, असा खर्च कुठून येतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे स्वतःला ज्योतिषाचार्य म्हणून घेणारा मनोहर भोसले भक्तांचं रोगनिवारण करत असल्याचा दावा करत होता. त्यामुळे अनेकांनी दुर्धर आजार बरे व्हावेत म्हणून या मनोहर मामाकडे हजेरी लावली आहे. मात्र याच मनोहर मामाच्या आईला जेव्हा अर्धांगवायू झाला त्यावेळेस त्याने आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.
तेव्हा या मनोहर मामाची शक्ती आणि बुवाबाजी कुठे गेली होती? असा सवाल विचारला जात आहे. उंदरगावच्या शिवारात मांडलेला भोंदूगिरीचा बाजार गावातील लोकांना पसंत नव्हता.
याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, खाकी आणि खादीच्या जोरावर मनोहरमामा थैमान घालत होता. मात्र, आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे तो सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम