Maharashtra News:राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय गेल्यावर्षीच सरकारने घेतला आहे. त्यानुसार तयारीही सुरू झाली होती.
सुरवातीला यासाठी संत ज्ञानेश्वारांनी जेथे ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवाशाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानंतर मुंबईत हे विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचाली सूरू झाल्या होत्या.
याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीतील रिद्धपूर येथे हे विद्यापीठ उभारण्याची मागणी होत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूरची घोषणा केल्याने नेवासे आणि मुंबई मागे पडले आहे.
नाशिकमध्ये काल झालेल्या महानुभाव संमेलनात देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यात रिद्धपुर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा केली.
अमरावती मराठी भाषेतील आद्यग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला, ते वाजेश्वरी स्थान रिद्धपुरात आहे. चांदूर बाजारपासून मोर्शी मार्गावर नऊ किलोमीटरवर रिद्धपूर आहे.
महानुभाव संप्रदायाचे रिद्धपूर तीर्थस्थान आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी रिद्धपूर येथे मठाची स्थापना केली.
लीळाचरित्र, सिद्धांतसुत्रे, सूत्रपाठ, दृष्टांत, प्रमेय-ग्रंथ अशी महानुभाव पंथाची ग्रंथसंपदा निर्माण झाली. आद्य कवयित्री महदाईसांंनी येथे धवळे रचले.
शिशूपाल वध, रुक्मिणी स्वयंवर या काव्यरचानाही येथेच रचल्या. त्यामुळे या जागेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने भाषा सल्लागार समितीच्या पुणे येथे १ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या बैठकीत भाषा सल्लागार समितीने ठराव मंजूर केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गेल्यावर्षी मार्चमधील अधिवेशानात या विद्यापीठाची घोषणा केली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने त्याचे ठिकणा निश्चित केले आहे. नेवासा येथे हे विद्यापीठ होण्याची संधी मात्र हुकली.