सोशल मीडियाचा प्रचंड गैरवापर..माहिती-तंत्रज्ञान कायद्यात दुरुस्ती करावी; शरद पवार

Content Team
Published:

मुंबई : कलमाबाबत राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचे भाष्य केले असून कायदा व सुव्यवस्तेवर व कलमांचा होणार गैरवापर यावर त्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.

याबाबत कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima) हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर विविध सूचना मांडण्याच्या उद्देशाने ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात (affidavit) शरद पवार यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

शरद पवार यांचे मत

कलम १२४-अ हे इंग्रजांच्या काळात वाढत्या स्वातंत्र्य चळवळीला दाबण्याच्या उद्देशाने भारतीय दंड विधानात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, अलीकडच्या काळात सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात किंवा लोकशाही व्यवस्थेत शांततेत मांडण्यात आलेला विरोधी विचार दाबण्यासाठीही या कलमाचा गैरवापर झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी भादंवि आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यात (युएपीए) आवश्यक व योग्य त्या तरतुदी आहेत. त्यामुळे १२४-अ या कलमाचा गैरवापर कायदादुरुस्ती करून थांबवायला हवा किंवा ते कलम रद्द करायला हवे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

सोशल मीडियाचा (social media) प्रचंड गैरवापर होत आहे

अलीकडच्या काळात सोशल मीडियाचाही प्रचंड गैरवापर होत असल्याचे नमूद करत माहिती-तंत्रज्ञान कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. माहिती-तंत्रज्ञान कायदा (Information Technology Act) हा दोन दशकांपूर्वी आणण्यात आला. त्यानंतर सायबर क्राइम (Cyber ​​Crime) व सायबर सुरक्षेच्या प्रश्नात आमूलाग्र बदल झाला आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया व डिजिटल मीडियावर (digital media) योग्य नियंत्रण नाही. सोशल मीडिया तर सध्या अनिर्बंध स्वरुपात आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही खोटा अपप्रचार कोणत्याही उत्तरदायित्वाविना पसरवला जाऊ शकतो.

खोट्या बातम्या व अपप्रचाराच्या माध्यमातून समाजात धार्मिक, जातीय तेढ व गंभीर तणाव निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. यादृष्टीने संसदेला कायदादुरुस्तीची शिफारस करणे आवश्यक आहे, असे मत शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe