अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात तापमान मध्ये चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. तापमानात होत असलेली घसरण पाहता शहरासह संपूर्ण जिल्हा गारठला आहे.
वातावरणातील गारवा वाढल्याने दिवसाही नगरकरांनी अंगात उबदार कपडे व डोक्यावर कानटोप्या घातल्या होत्या. नगर जिल्ह्यासह राज्यात सध्या गारठा वाढला आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. या थंडीनं नगरकरांना हुडहुडी भरविली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झालं होतं. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणार्या वेगवान वार्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.
धुळीच्या वादळामुळे राज्यातील अनेक भागातील पारा घसरला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. 25 व 26 जानेवारी रोजी उत्तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
अचानक ढगाळ वातावरण व थंडी वाढल्याने जिल्ह्यात सर्दी, खोकल्याने बाधित रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच थंडीमुळे सांधेदुखीचा आजार असलेल्या नागरिकांचे दुखणे देखील वाढले आहे.
थंडीच्या काळात वाफ घेणे, ताजे व गरम खाण्याची तसंच बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळण्याची गरज असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम