Rahul Gandhi : चीनने लडाखमधील आपली जमीन बळकावली आणि आता नव्या नकाशाद्वारे अरुणाचल प्रदेश, अक्साई चीनवर दावा केला असून, हे गंभीर असल्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपने मात्र राहुल यांचे दावे बिनबुडाचे असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. लडाखमधील एक इंच जमीनदेखील चीनच्या ताब्यात गेली नसल्याचे पंतप्रधान सांगत आहेत. परंतु मी नुकताच लडाखवरून परतलो असून, चीनने आपला मोठा भूभाग बळकावल्याचे संपूर्ण लडाखला माहीत आहे.
पंतप्रधान खोटे बोलत आहेत, असे राहुल म्हणाले. चीनच्या नव्या नकाशाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. चीनने अक्साई चीन व अरुणाचल प्रदेशवर दावा सांगत नवा नकाशा जारी करणे गंभीर आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांनी आधीच आपली जमीन बळकावली आहे.
राहुल गांधी यांचे दावे, आरोप बिनबुडाचे आहेत. चीनने नेहरूंच्या कार्यकाळात भारताचा ४३ हजार चौरस किमीचा भूभाग बळकावला आहे. यासाठी राहुल नेहरूंना गद्दार म्हणणार का? असा घणाघात भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला.
मोदींच्या नेतृत्वाखालील भारताची एक इंच जमीनही कोणी बळकावू शकत नाही. देशाच्या जनतेचा मोदींवर विश्वास आहे आणि त्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार, असा दावाही भाजप प्रवक्त्याने केला.