मोदींचे बालमित्र अब्बास आले समोर म्हणाले, मोदींच्या घरी राहिलो, पण…

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या वाढदिवशी एक खास ब्लॉग लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी बालपणीचे मुस्लिम मित्र अब्बास अली यांच्याबद्दलच्या आठवणीही सांगितल्या आहेत.

तेव्हापासून त्यांच्या या मित्राची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. अब्बास सध्या सिडनीमध्ये राहतात. मोदींनी लिहिलेल्या आठवणींवर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांच्या घरी एक वर्ष राहिल्याचे त्यांनी मान्य केले असले तरी मोदींकडून मदत घेतली नसल्याचे आणि त्यानंतर पुन्हा फारशी भेटही झाली नसल्याचे अब्बास यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे की, अब्बास यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मोदींच्या वडिलांनी त्याला घरी आणलं. आमच्यासोबत राहूनच अब्बासने शिक्षण पूर्ण केले. आई आम्हा सर्व भावंडांप्रमाणेच अब्बासची प्रेमाने काळजी घ्यायची. दरवर्षी ईदच्या दिवशी ती त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे.

सणासुदीला, आजूबाजूची मुले आमच्या घरी यायचे आणि आईच्या हातच्या खास पदार्थांचा आस्वाद घ्यायचे.”यावर अब्बास यांनी सांगितले आहे की, “माझे वडील आणि मोदींचे वडील मित्र होते. दोघांच्या गावात ४ किलोमीटरचं अंतर होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर एक वर्ष मी मोदींच्या वडिलांच्या घरी राहिलो.

त्यांनीच मला घरी नेलं होतं आणि पुढे तिथे राहूनच वर्षभरात मॅट्रिक परीक्षा पास झालो. आम्ही तेव्हा होळी, ईद, दिवाळी एकत्रच साजरी करत होतो. मोदींची आई ईद असताना सेवई बनवायच्या.

आज जे वातावरण आहे तसं वातावरण तेव्हा नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीच मदत घेतली नाही. अहमदाबादमध्ये राहत असूनही कधी आम्ही भेटलो नाही. खूप कमी वेळा आमची भेट झाली.