Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्यावेळी अशी एखादी कृती करतात की त्याची चर्चा होते. देहू येथील कार्यक्रमासाठी येताना पुणे विमानतळावरही त्यांनी अशीच एक कृती केली.
तिची आता चर्चा सुरू झाली आहे. विमानतळावर स्वागतासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोदींनी जवळ जाऊन विचारपूस केली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू झाली आहे.पंतप्रधान मोदी विमानतळावर आल्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यात येत होते.
लाल गालिचावरून मोदी जात असताना नेते बाजूला उभे होते. एक नंबरला अजित पवार, नंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस या नुसार नेते व अधिकारी उभे होते. विमानातून उतल्यानंतर अजित पवार यांनी हात जोडून मोदींचे स्वागत केले.
मास्क लावलेले अजित पवार सध्या हस्तांदोलन करणेही टाळतात. त्यांनी हात जोडून नमस्कार केला असताना मोदी मात्र काही पावले त्यांच्या दिशेने चालत गेले आणि चक्क पवार यांच्या खांद्यावर हात ठेवून काही क्षण त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस शेजारीच उभे होते.
सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या घडामोडी सुरू आहेत. तर देशपातळीवर राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे पवार काका-पुतणे चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत मोदी यांनी अजितदादांच्या जवळ जाऊन, खांद्यावर हात ठेवत दाखविलेली आस्था आता चर्चेचा विषय बनली आहे.