टोल माफी दाखवूनही फास्टॅग मधून पैसे होतायत कट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर संगमनेर तालुक्यातील रहिवाशांना टोल माफी करण्यात आली आहे. मात्र, फास्टॅग असलेल्या वाहन चालकांना टोल माफी दाखवून काही वेळानंतर अथवा दुसऱ्या दिवशी बँकेशी जोडलेल्या फास्टॅग मधून पैसे कापले जातात.

त्यामुळे बुधवारी (दि.०८) या टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संगमनेर शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्या सादर करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक वाहनधारकांच्या वाहनांची फास्टॅग विरहित स्वतंत्र रांग करावी.

खड्डे, स्ट्रीट लाइट, सर्व्हिस रस्ते दुरुस्ती, तसेच न झालेले सर्व्हिस रस्ते व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नाशिक-पुणे महामार्गावर कऱ्हे घाट ते बोटा खिंडी पर्यंत असंख्य खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. अनेक गावांच्या हद्दीत अजूनही सर्व्हिस रस्ते झालेले नाहीत. महामार्ग दोन्ही बाजूच्या साईडपट्टी खचल्याने खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी डांबरी रस्ता आणि त्याची साईडपट्टी यात अंतर पडलेले आहे.

ते दुरुस्त करणे. आदी मागण्या निवेदनाद्वारे टोलनाका प्रशासनाकडे करण्यात आल्या. प्रत्येक वेळेस बैठका व वेळ काढू भूमिका टोलनाका प्रशासनाने यापूर्वी घेतली. मात्र, आमच्या मान्य न झाल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी टोलनाका प्रशासनावर राहील. असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News