अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील मुदत संपणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक पूर्वक प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
नगर जिल्ह्यात 73 जिल्हा परिषद गट आणि 146 पंचायत समिती गणासाठी येत्या जानेवारी अथवा फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार सुरू असून विविध पक्षांतील मातब्बरांना आपल्या पक्षात आणण्याची रस्सीखेच सुरू आहे.
राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अधिनियमनानुसार जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकली जावू शकत नाही.
यामुळे राज्य निवडणूक आयोगाने वेळेतच निवडणुका घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरीकडे 2011 च्या जनगणनेच्या आधारे गट आणि गणाची रचना करायची असल्यामुळे सध्याच्या मतदारसंघ संख्येमध्ये बदल होणार नाही, अशीच शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काढलेल्या आदेशात 30 नोव्हेंबरपूर्वी प्रभागरचना तयार करण्यात यावी, असे म्हटले आहे. प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीची कार्यवाही करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता निवडणुका या मुदत समाप्तीपूर्वी पार पडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम